मराठी विषयातील लघुअभ्यासक्रम हा भाषा आणि भाषाकौशल्ये यांवर भर देणारा पदवीस्तरावरील अभ्यासक्रम आहे. भाषाव्यवस्थेशी संबंधित विस्तृत ज्ञानक्षेत्रे विद्यार्थ्यांना खुली करतानाच मराठी भाषेचे समकालीन जागतिक परिप्रेक्ष्यातील स्थान आणि महत्त्व तसेच मराठी भाषेतून उपलब्ध होऊ शकणाऱ्या करिअरच्या विविध संधीही त्यातून अधोरेखित केल्या जातात.
यांत अर्थातच भाषिक कौशल्ये हा कळीचा मुद्दा आहे, जसे की- भाषांतर कौशल्य, सर्जनशील लेखनाचे कौशल्य, संपादन कौशल्य, मुलाखत घेणे व मुलाखतीचे शब्दांकन इत्यादी. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांची विविध लेखनकौशल्ये वाढीस लागावीत, विशिष्ट विषय वा क्षेत्रांतील भाषिक प्रकल्प राबवता यावेत, नवनवी कौशल्ये आत्मसात करून त्यांची वर्ग तसेच वर्गापलीकडील क्षितिजे विस्तारावीत, अशी रचना असलेला हा विद्यार्थीभिमुख अभ्यासक्रम आहे.